Ad will apear here
Next
हाडाच्या कार्यकर्त्या, संवेदनशील लेखिका – दीपा देशमुख
दीपा देशमुख

प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांचा २८ ऑक्टोबर हा जन्मदिन. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाच्या औचित्याने दीपाताईंची जिवाभावाची मैत्रीण डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ यांनी लिहिलेला, दीपाताईंची वाटचाल उलगडणारा लेख त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. कार्यक्रमाचा व्हिडिओही शेवटी दिला आहे.  
.........
२३ आणि २४ ऑक्टोबर रोजी कितीही घाई असली तरी मी मुद्दाम वेळ काढून ठेवला होता. याचं कारण म्हणजे माझी सख्खी मैत्रीण लेखिका दीपा देशमुख आणि तिचे शिक्षणतज्ज्ञ मित्र राजीव तांबे सर यांची एकमेकांसोबत ऑनलाइन गप्पांची मैफल. 

प्रयोगशील शिक्षणप्रसारासाठी वर्षानुवर्ष काम करणारे, लहान मुलांचे प्रिय लेखक, मार्गदर्शक राजीव तांबे आणि वेगवेगळ्या सामाजिक कार्यात कृतिशील असणारी आणि जीनियस, सुपरहिरो, कॅनव्हास, सिंफनी, गुजगोष्टी यांसारखी अनेक पुस्तकं लिहिणारी माझी मैत्रीण दीपा हे दोघंही पुढचे पाऊल आणि मैफिल यांनी आयोजित केलेल्या व्यासपीठावर गप्पांची मैफल रंगवणार होते. 

२३ तारखेला म्हणजेच पहिल्या दिवशी दीपा प्रश्न विचारून राजीव तांबे सरांना बोलतं करणार आणि २४ तारखेला म्हणजेच दुसऱ्या दिवशी राजीव तांबे सर दीपाला प्रश्न विचारणार आणि बोलतं करत दीपाचा आजपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवणार असं या मैफलीचं स्वरूप असणार होतं. 

पहिल्या दिवशी दीपाने आम्ही दोघे कुठल्याही औपचारिक भाषेत एकमेकांशी बोलू शकत नाहीत हे जाहीर केलं आणि त्यानंतर राजीवजींची अनौपचारिक बॅटिंग सुरू झाली झाली ती अक्षरशः आम्हा प्रेक्षकांना सगळ्यांना खळाळत्या पाण्यात ढकलून देऊन. तांबे सरांनी पालकांना, उपस्थित श्रोत्यांना स्वच्छ, चकाचक करून, पालकांची चुकीची मानसिकता अक्षरशः धुवून काढली. तेही अगदी सहजपणे कुठेही अहंकार नाही, कुठलाही अभिनिवेश नाही. एका उत्तम व्यक्तिमत्त्वाची ओळख दीपामुळे आणि या कार्यक्रमामुळे झाली. (या मुलाखतीवरचा सविस्तर लेख दीपाने लिहिला आहे. तो वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दीपाला ओळखणाऱ्या सगळ्यांना माहीत आहे, की तिचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे, की तिने जे अनुभवलं, पाहिलं, ऐकलं, ते सगळं अगदी जसंच्या तसं ती शब्दांमध्ये बांधून वाचकांसमोर चित्रमय शैलीत उभं करू शकते. 

कुठलाही कार्यक्रम, नाटक, चित्रपट, भेटीगाठी, मुलाखती, अगदी पुस्तक वाचलेला अनुभवसुद्धा दीपा तिच्या उत्स्फूर्त ओघवत्या शैलीमध्ये मांडते, लिहिते आणि आपल्या सगळ्यांना तो कार्यक्रम न उपस्थित राहताही पुन्हा प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद देते. 

कुठलाही मुद्दा न विसरता अगदी जसं घडलं तसं, एखादा व्हिडिओ शूट केल्याप्रमाणे तिच्या डोक्यात असतं. राजीव तांबे सरांच्या मैफलीचंही असंच सुंदर वर्णन तिनं एफबी पोस्टद्वारे टाकलं आहेच. परंतु मी हा लेख राजीव सरांनी दीपाबरोबर ज्या गप्पा मारल्या आणि तिचा प्रवास उलगडला त्यावर लिहीत आहे. कारण दीपा स्वतःच स्वतःच्या मुलाखतीबद्दल लिहिणार नाही याची मला खात्री आहे. 

दीपाच्या मुलाखतीची सुरुवातसुद्धा तांबे सरांनी अगदी अनौपचारिक पद्धतीने आणि जसे दोघे मित्र कोचवरून बसून गप्पा मारत आहेत़ अशीच केली. त्यामुळे आम्हां श्रोत्यांनासुद्धा ऐकताना कुठेही त्यांच्यात आणि आमच्यात अंतर वाटत नव्हतं. त्यांनी अत्यंत उत्तम रीतीने दीपाचा हा प्रवास खुलवला. 

मुलाखत एवढी रंगली, की दीपाचं बोलणं संपूच नये असं वाटतं होतं. तिच्या प्रत्येक पुस्तकातलं विश्व तिच्याच शब्दांत ऐकावं असं वाटत होतं. 

एका छोट्या मुलीचा प्रवास औरंगाबाद ते मासवण, मासवण ते मुंबई आणि नंतर मुंबई ते पुणे इथपर्यंत कसा पोहोचला, हे ऐकताना आम्ही सगळे जण भान हरपून गेलो होतो. दीपा ही उच्चविद्याविभूषित, संगीत विशारद असलेली मुलगी. एका सरकारी अधिकाऱ्याची संपन्न घरातली मुलगी. 

साहित्य, कला, गाणं, नाटक, यांत रमणारी, पुस्तकांच्या जगात हरवून जाणारी, स्वत:च्या भावविश्वात रमत, स्वप्नात फिरणारी ही मुलगी कधी काळी फक्तर स्वत:च्या डायरीत व्यक्त व्हायची आणि मनातलं कधीही कोणाशी फारसं बोलायची नाही यावर आता विश्वास बसणार नाही. अर्थात त्याही वेळी ती गाणी, कविता, गझल लिहायची, नाटकात काम करायची, कॉलेजला असताना तर राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत तिला जब्बार पटेल या विख्यात दिग्दर्शकाकडून अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं. 

याच मुलीच्या आयुष्यात एके दिवशी एक वळण आलं आणि ती मुंबईसारख्या महाकाय शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मासवण नावाच्या आदिवासी गावात जाऊन पोहोचली. मासवण या आदिवासी गावामध्ये शिक्षण विभागप्रमुख म्हणून तिला काम करायचं होतं. 

मनातलं कोणाजवळही सहजासहजी व्य.क्त न करणारी ही मुलगी तिच्या आवडत्या किशोरकुमारची गाणी मोठ्यानं गात गात स्कूटीवरून फिरत असते, तेव्हा मग लोकंही तिच्याकडे अचंबित होऊन पाहत असतात. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती तिला जे वाटतं तेच करत असते. तिला गाणी गावी वाटली की गाते, तिला चित्रपट बघावा वाटला, तर बघते आणि त्यातल्या भावनिक प्रसंगात समरस झाल्यानं ओक्साबोक्शी रडायलाही लागते. चित्रपटगृहातून बाहेर पडताना सगळे लोक तिच्याकडे बघत असले, तरी ती मात्र आपल्यातच असते. अशा वेळी सगळ्यात जास्त त्रास होतो, तो तिच्याबरोबर असलेल्या तिच्या मुलाला. प्रत्येक वेळी ‘अगं लोकं पाहत आहेत’ असं तो तिला सांगत राहतो; पण प्रत्येक वेळी तिच्याकडून तेच घडतं. तर ही अशी मनस्वी मुलगी स्कूटीवर बसून गाणी गात मासवण या आदिवासी गावामध्ये जाऊन पोहोचली. 

तिथे पोहोचल्यावर तिला कळलं, की शहर आणि कल्पनेतलं आदिवासी गाव यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. अशा दुर्गम ठिकाणी ती पोहोचली होती, की जिथे मनोरंजनाचं कुठलंही साधन असणं, तर दूरच, परंतु नॉर्मल एकमेकांना इमर्जन्सीमध्ये संपर्क करण्यासाठीदेखील मोबाइलची व्यवस्था नाही. कारण त्या गावात मोबाइलचे टॉवरदेखील नव्हते. 

घरात शिरताना दारात, कधी साप तर कधी विंचू होते. आठ तासांचं विजेचं लोडशेडिंग आणि पावसाळ्यात तर सूर्या नदीला पूर आला की ऑफिसमधला लँडलाइन फोनही किती तरी दिवस बंद असायचा. पावसाळ्यात पाड्यापाड्यांवर जाताना मांडीएवढ्या चिखलातून चालत जाताना कशी तारांबळ उडायची आणि शहरी उपाय कसे फोल ठरायचे याबद्दलही तिनं सांगितलं. तसंच अगदी सुरुवातीच्या काळात उत्साहाने तिने शिक्षकांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम तिथल्या शासकीय, खासगी कार्यकर्त्यांमधल्या राजकारणामुळे कसा सपशेल पडला आणि त्यामुळे तिची कशी फजिती झाली; पण यातूनही तिला विजयाताई चौहान यांनी कसं बळ दिलं आणि ती शिकत गेली याचाही अनुभव तिनं सांगितला. 

अशा ठिकाणी तिने राहायला सुरुवात केली आणि नुसती राहिली नाही तर शहरानं आणि संस्कारांनी दिलेलं सगळं विरघळून टाकून फक्तआ हाडाची कार्यकर्ती असलेला तिचा मूळ पिंड तिनं खुलवला, जपला आणि ती माणूस म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून परिपक्व, होत गेली. इथेच तिचं माणूसपण उजळवून निघालं. वैचारिक परिपक्वता, नैतिक मूल्यं, विवेकाचा आवाज, संवेदनशीलता या मानवतेच्या मूल्यांवरचा तिचा विश्वास घट्ट होत गेला. 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आदिवासी राहतात. त्यांच्या सवयी, त्यांची आयुष्यं अत्यंत वेगळी, निसर्गपूरक आहेत़, याचा अनुभव तिला आला. तिथल्या आदिवासी जीवनाशी जुळवून घेताना दीपाच्या शहरी सवयी आणि गरजा कशा आपोआप क्षीण होत गेल्या आणि नंतर त्या अत्यंत कमी झाल्या हे कळत गेलं. कमीत कमी गरजा ठेवून उत्तम जगता येतं यावर तिची अंमलबजावणी सुरू झाली. आजही ती त्याच प्रकारे जगते हे महत्त्वाचं आहे. 

मासवणमधली १५ गावं आणि ७८ पाडे इथे शिक्षणावर तिनं काम केलं. शिक्षणाची जाणीवजागृती व्हावी यासाठी स्वत:च्या लेखणीचा प्रत्यक्ष कामात उपयोग करत तिनं वेगवेगळी गाणी रचली, पथनाट्यं लिहिली, शिबिरं घेतली, आणि पथनाट्य कार्यकर्त्यांकडून बसवून स्पर्धांमधून बक्षिसंही मिळवली. 

आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न, शाळाबाह्य मुलांच्या समस्या, कुपोषण आणि डोळ्यात होणारे मोतिबिंदू यांचे प्रश्न, गरिबी, बेरोजगारी अशा अनेक गोष्टी बघत, अनुभवत तिने शिक्षणावरचं ७८ पाड्यांवरचं सर्वेक्षण करत आकडेवारी गोळा केली. 

दीपा या संस्कृतीशी एकरूप होत गेली. कार्यकर्ता म्हणूनच नाही, तर माणूस म्हणून ती परिपक्व होत गेली. नैतिक मूल्यं, विवेकाचा आवाज, संवेदनशीलता या मानवतेच्या मूल्यांवरचा तिचा विश्वास दृढ होत गेला. वाचनातून मिळालेली दृष्टी सामाजिक कार्यानं आणखी व्याशपक झाली. मासवण इथे काम करताना कार्यकर्ती म्हणून मिळालेलं संचित ती अजूनही जपते आहे. कार्यकर्ता म्हणून जुळलेली सामाजिक बांधिलीची नाळ ती तुटू देत नाही. म्हणूनच तिचं लिखाणही सामाजिक बांधिलकीची आठवण करून देणारं आहे. 

नंतर नर्मदा बचाव कार्यात विजयाताई चौहान यांच्यासोबत दीपानं सहभाग घेतला. एके दिवशी ती थेट नर्मदा आंदोलनाच्या बडवाणी या गावामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचली. तिथे तिची भेट मेधा पाटकर यांच्यासोबत झाली. पहिल्यांदा मेधाताईंना पाहिलं तेव्हा एक साधी सुती साडी, तीही कुठे तरी थोडी फाटलेली, पायात चपला नाही अशा अवस्थेत त्या होत्या. प्रत्येकाशी बोलताना, वागताना, त्यांची विचारपूस करताना त्यांची प्रेमळ नजर आपल्या लक्षात राहिल्याचं दीपा सांगते. दीपाच्या आयुष्यातला हा खूप मोठा क्षण होता, जेव्हा ती प्रत्यक्ष मेधाताईंना भेटली होती. त्या क्षणी तिनं आपण आठ दिवस तरी मेधाताईंबरोबर राहायचं आणि इथला प्रश्न समजून घ्यायचा असं ठरवलं. 

एका रात्री एका बोटीत सगळे कार्यकर्ते, मुलं-मुली, तिथली लोकं, मेधाताई, दीपा सगळे निघाले असताना अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. नर्मदेच्या उंचच उंच लाटा उसळून त्या बोटीतल्या प्रत्येकाला अक्षरश: झोडपून काढत होत्या. बोट तर कधी उलटी होऊन नर्मदेत नाहीशी होईल हे सांगता येत नव्हतं. अशा भयंकर अवस्थेत सगळ्यांनी एकमेकांना धरून रात्र काढली. दीपा सांगत होती, त्या वेळी मला कळलं, की आयुष्य किती क्षणभंगुर आहे आणि आपण कशासाठी एवढ्या गोष्टीचा व्याप वाढवतो. मृत्यूला जवळून बघताना ती अनेक गोष्टींतून डिटॅच व्हायचं शिकली. जेवढं शक्य होईल तेवढं राग, लोभ, द्वेष, मत्सर, असूया या सगळ्यांपासून दीपाने स्वतःला संपूर्णपणे सोडवून घेतलं. आणि तिने आयुष्याकडे एका संतुलित तरीही परिपूर्ण दृष्टीने पाहायला सुरुवात केली. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं, त्याचा स्वत:वर किती परिणाम होऊ द्यायचा हे तिला कळलं. 

त्यानंतरही अनेक छोट्या-मोठ्या सामाजिक उपक्रमांत दीपा नेहमीच काम करत आली आहे. आश्रमशाळा, अंध-अपंग मुलांसाठी कामं, स्त्रियांच्या सक्षमीकरणावरचं कार्य, मानसिक आरोग्य यांवर ती आजही काम करते आहे. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या प्रेरणेने तिने मानसिक आरोग्यावर काम सुरू केलं, जे ती आजही करत आहे. 

तिच्यातल्या सामाजिक जाणिवा अशा व्यापक झाल्यानं पीडित, शोषित यांच्यासाठी शक्य तेवढं काम करणं, वेळेवर धावून जाणं हे सगळं ती कुठलाही गाजावाजा न करता सातत्यानं आजही करत असते. 

त्यामुळे आजच्या तरुणाईशी, कार्यकर्त्यांशी या कामातून तिने नाते जोडले आहे. तिचा एक मोठा वैश्विक परिवार आहे, ज्यात केवळ महाराष्ट्रातीलच नाहीत तर देश-विदेशातील मंडळी आहेत. 

यानंतर तांबे सरांनी दीपाच्या लेखनप्रवासाबद्दल तिला बोलते केले. दीपाचा व्यातवसायिक लेखनप्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला तो अच्युत गोडबोले यांच्या भेटीमुळे. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमात मानपत्र वाचताना डॉ. अच्युत गोडबोले यांनी दीपाला ऐकलं आणि कार्यक्रमानंतर ‘तू खूप छान बोलत होतीस’ असं तिला आवर्जून सांगितलं. ‘तू काय करतेस,’ असं विचारत त्यांनी स्वतःचा फोन नंबर तिच्या डायरीमध्ये लिहून दिला. 

त्यानंतर दीपाचं काम बघायला अच्युत गोडबोले मासवणला आले. त्या वेळी तिने आपल्या स्कूटीवर मागे बसवून त्यांना केळवा बीच फिरवून आणला. त्या प्रवासात तिने आपल्याला येणाऱ्या अनेक गझल आणि कविता गाऊन दाखवल्या. वर पुन्हा गझल काय असते यावर त्यांचाच क्लासही घेतला. तिने लिहिलेल्या कथा-कविताही त्यांना ते गेल्यावर मेल केल्या. 

एके दिवशी डॉ. अच्युत गोडबोले यांचा दीपाला फोन आला. ते तिला म्हणाले, ‘दीपा, मी अनेक पुस्तकं वाचतो आणि मला हवी ती माहिती एकत्र करतो आणि मग संकलन करून पुस्तक लिहितो. परंतु तू उपजत अशी लेखिका आहेस. तुझ्यात सर्जनशीलता आहे, कल्पकता आहे आणि प्रतिभा आहे. ज्ञान आणि सर्जनशील प्रतिभा हे गुण एकत्र करून फार सुंदर पुस्तकांची निर्मिती आपण करू शकतो. तू मला पुस्तक लिहायला मदत करशील का?’ दीपाने आनंदाने हो म्हटलं. 

जीनियसच्या प्रवासात गणित, विज्ञान या विषयांना भिणाऱ्या दीपाला अच्युत गोडबोले यांनी कागद-पेन घेऊन शिकवायला सुरुवात केली आणि तिची भीती दूर केली. अणुऊर्जा म्हणजे काय, ती कशी तयार होते, अणुबॉम्ब कसा तयार होतो याबद्दल समजवताना त्यांनी इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, कक्षेतलं त्यांचं फिरणं आणि ती साखळी अनियंत्रित केली तर अणुस्फोट कसा होतो आणि नियंत्रित केली तर हीच ऊर्जा विधायक कामासाठी कशी वळवता येते हे समजावून सांगितलं. कुठलीही कठीण गोष्ट सोपी करून सांगणारा, शिकवणारा गुरू लाभल्यामुळे दीपामधला सगळं शिकायला उत्सुक असणारा विद्यार्थी लगेच जागा झाला आणि त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. साध्या गणिताच्या सूत्रापासून ते अनेक वैज्ञानिक शोध कसे लावले जातात, त्यांच्या थेअरीज, त्यामागचे दृष्टिकोन, शास्त्रज्ञांचं आयुष्य, त्यांच्या आयुष्यातला संघर्ष, उपेक्षा या सगळ्यांचा तिने खोलवर अभ्यास करत लिखाण सुरू ठेवलं. 

दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले या दोन लेखक, अभ्यासक आणि बुद्घिमान व्यक्तींनी एकानंतर एक अशा दर्जेदार पुस्तकांच्या सीरिज लिहिल्या. 

डॉ. अच्युत गोडबोले यांच्याकडून काय शिकलीस, या तांबे सरांच्या प्रश्नाला उत्तर देताना दीपाने सांगितलं, की चिकाटी, वेळेचं नियोजन, विषयाचा खोलवर अभ्यास आणि काहीही झालं तरी कितीही वेळा लिहावं लागलं तरी चालेल, पण लिखाण परिपूर्ण आणि समाधानकारक होईपर्यंत थांबायचं नाही. आणि ऑर्गनाइज्ड पद्घतीनं काम करायचं या पाच गोष्टी अच्युत गोडबोले यांनी दीपामध्ये रुजवल्या. त्यामुळेच वेळेत आणि अभ्यासपूर्ण लिखाण आम्ही करू शकलो असे ती नेहमीच सांगत आली आहे. 

त्यानंतरच्या लेखन प्रवासातील अच्युत गोडबोले यांच्याबरोबर लिहिलेल्या कॅनव्हास आणि सिंफनी या दोन अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाच्या प्रवासाबद्दल तांबे सरांनी दीपाला प्रश्न विचारले. 

या प्रत्येक पुस्तकाबद्दल दीपाकडून ऐकायचं झालं तर प्रत्येक पुस्तकावर वेगवेगळी अनेक सत्रं आयोजित करावी लागतील, इतकं ते काम मोठं आहे; पण तरीही तिने वेळेचं भान ठेवून तिनं सिंफनी आणि कॅनव्हास या पुस्तकांची निर्मिती आणि त्यातल्या कलाकारांविषयी, संगीतकारांविषयी थोडक्यात सांगितलं. 

रिचर्ड फाइनमन या शास्त्रज्ञाप्रमाणे एल्व्हिीस प्रिस्ले हा दीपाचा अत्यंत फेवरेट संगीतकार आहे. तिच्या तोंडून एल्व्हिवस प्रिस्लेचं नाव ऐकलं की ती अजूनही त्याच्या किती प्रेमात आहे ते आपल्याला लगेच कळतं. 

दीपाने सिंफनी लिहिताना, पाश्चिमात्य संगीताचा इतिहास, त्यातले कालखंड, त्या वेळचं सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन यांचा अभ्यास केला. इतकंच नाही, तर अभिजात संगीतापासून ते आधुनिक बंडखोर जॅझ, पॉप संगीताचा अभ्यास केला. या संगीतकारांनी रचलेल्या संगीतरचनांचा अभ्यास केला. बाख, मोत्झार्ट, बिथोवन, बर्टोक, विवाल्डी, हँडेलसह अनेकांच्या संगीतरचना शेकडो वेळा ऐकल्या. किती तरी संदर्भ शोधले. अभ्यास, मनन, चिंतन आणि मग लेखन करून सिंफनी आकाराला आलं. पाश्चिमात्ये संगीत आणि संगीतकार या विषयांवर सोप्या भाषेत आणि तेही मराठीत पुस्तक तयार होणं ही फार मोठी उपलब्धी दीपा आणि अच्युत गोडबोले यांच्यामुळे आपल्याला मिळाली आहे. माझ्यासाठी एक महत्त्वाची चकित करणारी, आनंद देणारी गोष्ट या पुस्तकाच्या वेळी घडली, ती म्हणजे सिंफनी हे पुस्तक दीपाने तिचा बालपणीचा मित्र अतुल गडकरी आणि मला अर्पण केलं आहे. 

कॅनव्हास या पुस्तकाची निर्मितीदेखील अशीच अत्यंत परिश्रम करत झाली. मुंबईतलं जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् आणि एनसीपीए यांची ग्रंथालयं, त्यात सातत्यानं सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत ग्रंथालयात बसून दुर्मिळ अशा तिथल्या पुस्तकांच्या नोट्स काढणं, आवश्यक पानांचे फोटो काढणं हे केलं. कारण ही पुस्तकं दुर्मीळ असल्यानं आणि नियम असल्यानं ग्रंथालयाबाहेर घेऊन जायला मनाई होती. अशा झपाटलेपणातून कॅनव्हाससारखं देखणं, दर्जेदार आणि उत्कृष्ट पुस्तक निर्माण झालं आहे. 

दीपाच्या या दर्जेदार, देखण्या अशा सुंदर पुस्तकनिर्मितीमागे मनोविकास प्रकाशनाचेसुद्धा कष्ट आहेत़. त्यांनी लेखकाला त्यांचं स्वातंत्र्य तर दिलंच आहे, त्याबरोबरच ते त्यांचे पुस्तक उत्तम होण्यासाठी व सामान्य वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी खूप मेहनत घेतात. 

‘कॅनव्हास’मधले मायकेलअँजेलो, लिओनार्दो दा व्हिंची, पॉल गोगँ, तुलुझ लॉत्रेक, पाब्लो पिकासो आणि रोदँ अशा अनेक चित्रकार-शिल्पकार यांच्या कथा, त्यांची आयुष्यं याबद्दल दीपानं सांगितलं. त्यातली काहींची आयुष्यं डोळ्यात अश्रू आणणारी, काही हृदयद्रावक प्रेमकथांनी हेलावून टाकणारी, तर काही युद्घाच्या काळात, माणुसकी हरवलेल्या माणसांच्या गराड्यात कला जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारी होती. 

नग्न शिल्पांमधलं सौंदर्य दीपानं खूप हळुवारपणे सांगितलं. रोदँचं द किस हे शिल्प म्हणजे दोन प्रेमी जीव एकमेकांच्या मिठीत असून ते दीर्घ असा किस घेत आहेत आणि त्याचा तिच्या मांडीवर ठेवलेला हात आहे. त्याच्या बोटांचा स्पर्श आपल्याही अंगावर रोमांच उठवेल असा असल्याचं सांगत दीपानं हे शिल्प गुगलवर शोधून जरूर बघावं असं सांगितलं. 

संगीताबद्दल बोलताना दीपा एका वेगळ्याच विश्वात आपल्याला घेऊन जाते. एक एक संशोधक, चित्रकार, शिल्पकार, संगीतकार आपल्यासमोर आपल्या कहाण्या सांगत आहे असं आपल्याला वाटत राहतं. दीपानं सांगितलेला बरोक काळातला, फोर सिझन्सचा विवाल्डी आपल्याला ऋतूंचं दर्शन घडवतो, तर हँडेल त्याच्या संगीतातून थेम्स नदीची सैर घडवत पाण्याच्या स्पर्शाचा, आवाजाचा फील करवतो. दीपा हे सगळं तिच्या असामान्य शैलीत आपल्यासमोर दृश्य उभी करते. हा अनुभव ज्यांनी मिस केला, त्यांनी यू-ट्यूबवर जाऊन हा कार्यक्रम आवर्जून पाहावा. अर्थात तिच्या पुस्तकातून हा अनुभव आपण कधीही घेऊ शकतो. 

कार्यक्रम शेवटाकडे जात असताना नेमकं माझं इंटरनेट गेलं आणि मला शेवटी प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात सहभागी होता आलं नाही. खरं तर नेट असतं तरी मला काही बोलता आलं असतं की नाही सांगता येत नाही. कारण दीपाची मुलाखत सुरू झाल्यापासून मासवणचा प्रवास ऐकता ऐकता मी तिच्या प्रत्येक दोन ओळींमध्ये मला माहीत असलेला दीपाचा प्रवास पुन्हा एकदा अनुभवत होते, पाहत होते आणि सतत माझे डोळे भरून वाहत होते. माझं हृदय अनेक आठवणींनी फुटेल की काय असं मला झालं होतं. 

दीपाने केलेले आणि करत असलेले अफाट परिश्रम, त्याग, मूल्यांची जपणूक आणि स्वाभिमान यांसाठी दिलेली किंमत, माणसांचे स्वार्थी-मतलबी चेहरे आणि यातून तावून सुलाखून निघून अनेक अंगांनी सोन्यासारखी झळझळत चमचमणारी माझी बुद्धिमान आणि सर्वांत श्रीमंत असलेली मैत्रीण दीपा.. कमालीची संवेदनशीलता अन् अफाट बुद्धी या दोन अफलातून गोष्टी दीपाकडे आहेत़ आणि या दोन्हींना अस्सल माणूसपण मिळवून देणारा विवेक तिच्या मनात कायम जागा आहे, झोपेतसुद्धा तो कधी झोपत नाही. 

प्रतिभासंपन्न विवेकी अशी माझी जिवाभावाची सखी दीपा ही कार्यकर्त्याचा पिंड असलेली एक साधी माणूस आहे आणि लेखक म्हणून, अभ्यासक म्हणून ती एक ज्ञानाचं, शब्दांचं भांडार आहे. अशा माझ्याच दुसऱ्या अंगाला, माझ्याच जिवाला माझी प्रेमाची मिठी... 

- डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ

(या मुलाखतीचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)
.........
(दीपा देशमुख यांचे ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ हे सदर Bytesofindia.com वर सुरू होते. त्यात त्यांनी वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या ५० व्यक्तींच्या प्रेरक गोष्टी उलगडून दाखवल्या. त्या गोष्टी आता पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘पाथफाइंडर्स’ या नावाने दोन भागांत हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ही पुस्तके खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.) 













 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BWHMCR
Similar Posts
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला
हिमालयाची सावली ‘अरे बाळ्या, डॉक्टरांचा नुकताच वाढदिवस झाला ना?’ माझा लंडनमधील मित्र विचारत होता. ‘हो, वाढदिवस १६ नोव्हेंबर. आणि आत्ताच नऊ डिसेंबरला ‘तन्वीर पुरस्कार सोहळा’ झाला; पण डॉक्टर आले नव्हते. तसे अंथरुणालाच खिळले आहेत. वयोमानपरत्वे तब्येत ढासळत चालली आहे. आता लंडनहून परत गेल्यावर भेटायला गेलं पाहिजे!,’ इति मी
गृहिणी-सखी-सचिव (उत्तरार्ध) परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात १९९८ साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षांनी पुरस्काराच्या वेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यवस्थितपणा, किती असावा, त्याच्या
स्वतःतलं अवखळ मूल जपलेला बाबा... दर वर्षी बाबा ऑगस्टच्या २६ तारखेला सकाळी फोन करतो आणि म्हणतो, ‘आज माझा वाढदिवस आहे मला विश कर.’ आणि मला ही त्याची सांगण्याची कल्पना खूपच आवडली. आज मात्र सकाळी फोन वाजला नाही आणि मी आळस झटकून बाबाला फोन लावला. शुभेच्छा दिल्या. त्याचा नेहमी येणारा उत्साही आवाज ऐकला. एकदम भारी वाटलं.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language